Saturday, January 1, 2011

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. पण आज फक्त एक नवीन वर्षच नाही तर नवीन दशकसुद्धा सुरु होतंय. कधी कधी नवल वाटतं कि खरच वेळ किती पटकन निघून जातो. हा हा म्हणता सुरु झालेल वर्ष.. कॅलेंडरची पाने जणू वाऱ्याने फडफडावीत तितक्याच वेगाने हे दिवस निघून जातात. आणि गेल्या वर्षीची अखेर आणि नवीन वर्षाचे स्वागत आपण कसे केले या आठवणीत आणि चर्चेतच १०-१५ दिवस निघून जातात.हल्ली तर सगळे दिवस सारखेच वाटतात.. रोजच्या ऑफिसच्या रुटीनमध्ये आपण इतके गुंतून गेलो असतो कि बऱ्याचदा मिळणाऱ्या सुट्ट्या ह्या आराम करण्यातच घालवल्या जातात.. लहानपणी मात्र असं नव्हतं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या निरनिराळ्या सणांमुळे त्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांमुळे म्हणा किंवा त्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या पक्वान्नांमुळे त्यांचं वेगळेपण जाणवायचं..
पण तसं म्हणाल तर आपल्या ह्या रहाटगाड्यात किती गुंतायचं आणि त्याबरोबर किती फरफटत जायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं. मला असं वाटतं कि रोजच्या जीवनात सुद्धा छोटे छोटे बदल करून आपल्याला आनंदी राहता येईल..
म्हणूनच मी ठरवलंय ह्या वर्षी काहीतरी वेगळं करायचं..कदाचित काही स्वतःतले माहित नसलेले गुणही माहिती होतील..बघूया किती जमतंय ते...

जाता जाता सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..